एनआयए मुख्यालय परिसराला छावणीचे स्वरुप   

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर हुसैन राणा यास कोठडी काळात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे, एनआयएच्या मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कडेकोट सुरक्षा व्यस्थेमुळे या परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही एनआयए॒ मुख्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलिस आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले. कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
 
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर तहव्वूरला अमेरिकेने भारताकडे सोपविले. गुरूवारी सायंकाळी विशेष विमानाने तहव्वूरला घेऊन अधिकार्‍यांचे पथक दिल्लीतील पालम विमानतळावर दाखल झाले. एनआयएने तहव्वूला अटक करुन विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १८ दिवसांची कोठडी सुनावली. पहाटेच्या सुमारास तहव्वूरला कडेकोट बंदोबस्तात एनआयए मुख्यालयात नेण्यात आले. तहव्वूर याच्याविरोधात गैरकृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) खटला चालविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.केंद्र सरकारने तहव्वूरविरोधात खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ वकील दयान कृष्णन हे एनआयएची बाजू मांडत आहेत. तर, कायदेशीर प्रक्रियेत अडथळा नको म्हणून दिल्ली विधी सेवा मंडळाचे पीयूष सचदेवा हे तहव्वूर याची बाजू मांडतील.

Related Articles